गौरव
भंडारा येथे मृत्यूमुखी झालेल्या बालकांना भावपूर्ण श्रद्धांजली
निर्दयी काळजाचे जागृत सेवक
ऑनड्युटी डोळे लावून झोपले होते
त्या भिंतींनाही आसवं फुटली नाहीत
आतल्या आत
धूर गिळून उभ्या होत्या
निरपराधांच्या आक्रोशाचे तमाशे पाहत
इथल्या नरसाळ्यात कोणता ऑक्सिजन भरून पडलाय
ज्याने जीव वाचविण्याऐवजी
जीव घ्यावा
आणि जगण्याआधीच मरणाला मिठी मारावी
क्षणात होत्याचं नव्हतं व्हावं
जन्मानं मृत्यूला कवटाळावं
अन्
ओल्या मासाच्या गोळ्याला
दोन श्वासाच्या अंतरानं जीवनाची
परिभाषा सांगण्याऐवजी
आगीत भाजून घ्यावं
भान हरपलेल्या माऊलीला
लेकराचं दर्शनही न व्हावं
ताटातूट कायमचीच
वात्सल्याची न भेटण्यासाठी
अशा मरणाचा भंडारा उधळणाऱ्या
इस्पितळात संवेदनांचा कोंडमारा होतोय
याचा श्वास कुणी मोकळा करेल का....
निष्पाप जीवांना सद् गती मिळो,
नवीन असा भंडारा होऊ नये हीच प्रार्थना
गौरव(जानेवारी१०/२०२१)
Comments
Post a Comment